अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून ६ ब्रास वाळूसह ५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली. वाडी चौक परिसरातील पुलावरून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी पकडला. या कारवाईत ६ ब्रास वाळूसह एकूण ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्राम महसूल अधिकारी अशपाक पिंजारी यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५० वाजेच्या सुमारास शहरातील वाडी चौकाजवळील पुलावरून एका डंपरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. डंपर क्रमांक एमएच ४६ एफ १८६० यामधून सुमारे ६ ब्रास वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. संबंधित डंपर चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही परवाना अथवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे तपासणीत समोर आले. यानंतर पोलिसांनी वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केला. या कारवाईत डंपर आणि वाळू असा एकूण ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी डंपरचालक आदेश कैलास पाटील, वय २६, रा. धार, ता. अमळनेर याच्याविरुद्ध विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमळनेर तालुक्यात नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि त्यानंतर होणाऱ्या वाहतुकीवर महसूल व पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात असली, तरी अवैध वाळू वाहतुकीचे प्रकार सुरूच असल्याचे या कारवाईतून पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर अधिक कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *