गडखांब शिवारात एक बिघा गांजाची शेती पोलिसांनी केली उद्ध्वस्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गडखांब शिवारात पोलिसांनी धाड टाकून सुमारे एक बिघा क्षेत्रातील गांजाची बेकायदेशीर लागवड उध्वस्त केली. या कारवाईत ओला व सुका गांजा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला असून शेतकऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्याच्या गडखांब शिवारातील शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम याना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना पंचनाम्यासाठी घेऊन पथक रवाना झाले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, नीलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, गणेश पाटील, श्यामल पारधी, नीलेश पाटील, विनोद पाटील यांचा समावेश होता. त्यांनी ७ रोजी सकाळी ६ वाजता गडखांब शिवारात छापा टाकला असता गटनंबर २३२४ मधील एका शेतात गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. ही शेती सुरेश लोटन पाटील यांची आहे. या शेतकऱ्याने मका सोबत शेतात गांजा लावलेला आढळून आला. सुमारे सहा फूट उंचीची झाडे उगवलेली होती. शेतकऱ्याने शेतात पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला दिसून आला. तसेच एका ठिकाणी गांजा वाळवायला ठेवलेला दिसला. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांने गांजा विकल्याचे देखील कबुल केले. फॉरेन्सिक पथकाने देखील पंचनामा केला. कायदेशीर प्रक्रिया झाल्यावर सर्व झाडे उपटवून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *