महिला पोलिसाला अश्लील संदेश व व्हिडीओ पाठवून व्हायरलची धमकी

अमळनेरच्या मूळ रहिवासी मुंबई पोलिसासह पत्नी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवून एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला तिचे नग्न व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेल्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, रवींद्र शिवाजी बोरसे (रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मुक्काम सर्वोदय नगर, अंबरनाथ पश्चिम, जि. ठाणे) याला त्यांनी ६ लाख ६० हजार रुपये तसेच ५ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली होती. वारंवार पैसे व अंगठी परत मागूनही त्याने नकार दिल्याने संबंधित महिला पोलिसाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा राग आल्याने रवींद्र बोरसे, त्याची पत्नी योगिता बोरसे व इतर दोघांनी ४ मे रोजी फिर्यादी महिला व तिच्या आजीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २५ मे रोजी रवींद्र बोरसे याने संबंधित महिला कॉन्स्टेबलला व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून, “तू माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यास माझ्याकडे व माझ्या पत्नी जवळील तुझे नग्न व्हिडीओ व फोटो व्हायरल करीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच “तुझे ५ लाख ७० हजार रुपये आणि अंगठी तुला एक रुपयाही मिळणार नाही,” असेही संदेशात नमूद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपवर अश्लील शिवीगाळ करून बदनामी करण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल रवींद्र बोरसे व त्याची पत्नी योगिता बोरसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७९ तसेच कलम ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सिद्धांत शिसोदे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *