
संत सखाराम महाराज यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; आढावा बैठकीत नियोजनाची रूपरेषा केली निश्चित
अमळनेर (प्रतिनिधी) यंदाचा संत सखाराम महाराज यात्रोत्सव उत्साहात, सुरक्षित व सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प.पू. प्रसाद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत यात्रोत्सव काळात प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या नियोजनाची रूपरेषा सादर केली. बैठकीस हभप प्रसाद महाराज, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, एमएसईबीचे मुख्य अभियंता तुषार नेमाडे, एसटी आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांच्यासह गिरीष कुलकर्णी, रवींद्र देशमुख, राजेंद्र देशमुख, अन्न व प्रशासन अधिकारी, डॉ. विलास महाजन, सचिन गावंडे, राधेश्याम अग्रवाल, सिद्धार्थ शिसोदे, गणेश पाटील, उदय देशपांडे, महेश दुसाने तसेच आरोग्य व पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नदीपात्र स्वच्छ करून सपाटीकरण करण्यात येणार असून भाविक व यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. तसेच रथ व पालखी उत्सवादरम्यान रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी यात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क राहणार असल्याचे स्पष्ट केले. वाहतूक व्यवस्थेत बदल करत समाधी मार्गाकडून जाणाऱ्या फाफोरे, बाहदरपूर, अंबापिंप्री, पारोळा या मार्गावरील एसटी बस सेवा पारोळा हेडावे नाका मार्गे वळविण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी दिली. तसेच भाविकांकडून मागणी आल्यास अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
एमएसईबीचे मुख्य अभियंता तुषार नेमाडे यांनी यात्रोत्सव काळात अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा राखला जाईल, तसेच रथ, पालखी मार्ग व नदीपात्रात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत विचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले. यात्रोत्सव हा गावाचा सामूहिक उत्सव असल्याने सर्वांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन हभप प्रसाद महाराज यांनी केले.

Leave a Reply