पीक विमा योजनेतील ‘मिड-सीझन ट्रिगर्स’ पूर्ववत करा; शेतकऱ्यांना न्याय द्यावा

किसान काँग्रेसचे मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे निवेदन; नैसर्गिक आपत्तीत तातडीच्या मदतीची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पूर्वीप्रमाणे ‘मध्यहंगामी प्रतिकूल परिस्थिती ट्रिगर्स’ (मिड-सीझन ट्रिगर्स) ही महत्त्वाची तरतूद तातडीने पूर्ववत लागू करण्यात यावी, अशी मागणी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि हवामानातील अनिश्चित बदलांमुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना अपेक्षित दिलासा देण्यात अपयशी ठरत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

मागील वर्षापासून पीक विमा योजनेतील बदलांमुळे ‘मिड-सीझन ट्रिगर्स’ ही महत्त्वाची तरतूद वगळण्यात आली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया केवळ पीक कापणी प्रयोगांवर आधारित राहिली आहे. पूर्वी ही तरतूद अस्तित्वात असताना अतिवृष्टी, पावसाचा खंड, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळत होती. मात्र, ही सुविधा बंद झाल्याने विमा हप्ता भरूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि रोगराईमुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. प्रत्यक्ष नुकसान झालेले असतानाही केवळ पीक कापणी प्रयोगांच्या निकषांमुळे अनेक शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरत नसल्याची वस्तुस्थिती निवेदनातून मांडण्यात आली. मागील दोन वर्षांत हजारो कोटी रुपयांचे नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प किंवा शून्य नुकसान भरपाई मिळाल्याच्या तक्रारी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. विमा हप्ता भरूनही लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेवरील विश्वास कमी होत असून भविष्यात योजनेचा मूळ उद्देशच निष्फळ ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी ‘मध्यहंगामी प्रतिकूल परिस्थिती ट्रिगर्स’ ही तरतूद त्वरित पूर्ववत लागू करावी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा विशेष अहवाल सादर करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पिरन पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पवार, शाम पवार, धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, प्रताप पाटील, श्रीराम पाटील, ताराचंद सूर्यवंशी, रोहिदास पाटील, सईद तेली, गिरीष पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *