
अमळनेरात महिलांसाठी ६ रोजी होणार गर्भाशय व स्तन कर्करोग निदान शिबिर
महिलांच्या आरोग्यासाठी रोटरीचा आरोग्यदायी पुढाकार
अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने गर्भाशय व स्तन कर्करोग निदान शिबिराचे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर येथील गणेश हॉस्पिटल (बी.एस.एन.एल. कार्यालयाजवळ) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांचे आरोग्य अनेकदा दुर्लक्षित राहते. विशेषतः गर्भाशय व स्तन कर्करोग हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले गेले तर त्यावर यशस्वी उपचार शक्य असतात. मात्र जागरूकतेचा अभाव, तपासणीची भीती किंवा आर्थिक अडचणींमुळे अनेक महिला आवश्यक तपासण्या टाळतात. याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब अमळनेरने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतः या तपासण्यांसाठी महिलांना ३५०० ते ४००० रुपये खर्च येतो. मात्र रोटरी क्लब अमळनेरच्या सामाजिक बांधिलकीतून या सर्व तपासण्या महिलांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी, सचिव रो. आशिष चौधरी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. ज्ञानेश्वर शेवाळे, डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट चेअरमन रो. प्रतिक जैन, प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉ. प्रसन्न जोशी, तसेच मेडिकल कम्युनिटीचे डायरेक्टर्स रो. डॉ. राहुल मुठे आणि रो. डॉ. शरद बाविस्कर यांचे मोलाचे योगदान लाभत आहे. रोटरी क्लब अमळनेरचे सर्व सदस्य या उपक्रमासाठी सक्रिय सहभाग घेत आहेत. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, नियमित तपासणीद्वारे सुरक्षित व निरोगी जीवन शक्य आहे, असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे
३५ ते ६० वयोगटातील महिलांसाठी विशेष शिबिर
हे शिबिर विशेषतः ३५ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या वयोगटात कर्करोगाच्या जोखमीचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे वैद्यकीय अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या वयोगटातील महिलांनी या संधीचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिरात या प्रमुख वैद्यकीय तपासण्या होणार
या शिबिरात महिलांसाठी स्तनाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी, गर्भाशयाच्या कर्करोगासाठी पॅप्समिअर तपासणी, स्तन कर्करोगासाठी मॅमोग्राफी तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दर महिन्यात करावयाच्या स्वतःच्या स्तन तपासणीबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार
या शिबिरासाठी गणेश हॉस्पिटल, अमळनेर येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभणार असून, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रसन्न जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या केल्या जाणार आहेत. प्रथम प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व त्यानंतर वैद्यकीय गरजेनुसार मॅमोग्राफी किंवा पॅप्समिअर तपासणी केली जाईल.
शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक
शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्वनाव नोंदणी आवश्यक असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी रोहित सिंघवी, राजेश जैन (अरिहंत मेडिकल), पूनम कोचर, अविनाश अमृतकर (अविनाश मेडिकल) येथे संपर्क साधावा.
महिलांसाठी आरोग्य जागरूकतेचा ठोस संदेश
वेळेवर तपासणी केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून जीव वाचू शकतो, हा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्यामुळे अमळनेर शहर व परिसरातील अधिकाधिक महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहावे, असे आवाहन रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply