अमळनेर तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर, निवडणुकीची रणधुमाळी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बिगर अनुसूचित व अंशतः अनुसूचित ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केल्यानंतर तालुक्यात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जून ते जुलै २०२६ या कालावधीत ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिलांसाठीचे आरक्षण विशेष ग्रामसभांमधून सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे.

आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्याचा अंतिम दिनांक ८ जून २०२६ निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर १२ जून रोजी तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून त्यामध्ये आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. यानंतर प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेला १७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जाणार आहे. १९ जून रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याच दिवसापासून हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. नागरिकांना व इच्छुकांना २५ जून २०२६ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकारी ३ जुलै २०२६ पर्यंत अभिप्राय सादर करणार आहेत. त्यानंतर अंतिम अधिसूचनेस ८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळेल. अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाला १० जुलै २०२६ रोजी व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

दरम्यान, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होताच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गावपातळीवर संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी संभाव्य प्रभाग रचना, आरक्षणाची शक्यता आणि राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगू लागल्या असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *