अमळनेरात अज्ञात व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातील महात्मा फुले भाजी मंडई परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या सुमारे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील अज्ञात इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटविण्यासाठी आणि नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी अमळनेर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेस संदेश पाठविला आहे.

याबाबत १३ जून २०२६ रोजी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता महात्मा फुले भाजी मंडईतील लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर संबंधित इसम आजारी व बेशुद्ध अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी पडलेला आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मृत इसमाचे अंदाजे वय ५५ ते ६० वर्षे, बांधा सडपातळ, रंग सावळा, डोक्यावरील केस पांढरे, उंची सुमारे ५ फूट, दाढी पांढरी असून अंगात भगव्या रंगाची वस्त्रे आणि गळ्यात तुळशीची माळ होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या अज्ञात इसमाचे नाव, पत्ता किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने अमळनेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५८७-२२३३३३ किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ८३२९२७८८२४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *