तालुका शेतकरी सहकारी संघ निवडणुकीत तिरंगी लढत; चिन्हवाटपानंतर प्रचाराला वेग

राष्ट्रवादीचे ‘सहकार’, भाजपाचे ‘किसान  विकास’ तर काँग्रेसचे ‘शेतकरी’ पॅनल मैदानात

 

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुका शेतकरी सहकारी संघाच्या बहुचर्चित निवडणुकीत गुरुवारी (दि. २१) उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून अंतिम उमेदवार यादीही प्रसिद्ध करण्यात आली. सहाय्यक निबंधक कार्यालयात सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया पार पडली. चिन्हवाटप पूर्ण होताच उमेदवारांनी सायंकाळपासून प्रचाराला सुरुवात केली असून तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.

यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनलमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली “सहकार पॅनल” रिंगणात उतरविण्यात आले असून या पॅनलमध्ये १५ उमेदवारांचा समावेश आहे.

दुसरीकडे भाजपाने खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली “किसान विकास पॅनल” जाहीर केले आहे. या पॅनलमध्ये १४ उमेदवार देण्यात आले असून महिला राखीव गटात फक्त एकच उमेदवार देण्यात आला आहे.

तर काँग्रेसकडून प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली “शेतकरी पॅनल” मैदानात उतरले आहे. या पॅनलने सोसायटी मतदारसंघात उमेदवार न दिल्याने एकूण १० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणुकीत महायुतीचे घटक असलेले विद्यमान आमदार आणि खासदार प्रत्यक्ष आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात काँग्रेसनेही स्वतंत्र ताकद लावत निवडणूक अधिक रंगतदार केली आहे. त्यामुळे तालुक्यात या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

दरम्यान, माजी आमदार शिरीष चौधरी तसेच शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत एकही उमेदवार दिलेला नसल्याने हा पक्ष निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकी संघाच्या जनरल मतदारसंघातील मतदार तालुकाभर विखुरलेले असल्याने उमेदवारांना तडाखेबंद उन्हात गावोगावी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची मोठी धावपळ सुरू होणार आहे. शहर भागातही मतदारांची संख्या मोठी असल्याने प्रचारयंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून सहकार क्षेत्रातील पुढील राजकीय समीकरणे या निकालावर अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे.

तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी ३० मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *