
रखडलेले ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ वितरित करण्याची केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दरवर्षी ३१ मे रोजी दिला जात असला, तरी गेल्या दोन वर्षांपासून आचारसंहितेच्या कारणास्तव ग्रामीण भागातील महिलांना या सन्मानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. रखडलेले पुरस्कार यावर्षी तरी वितरित करावेत, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ९ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व गटपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ३१ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयानुसार ३१ मे २०२३ पासून राज्यातील अनेक महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच प्रति महिला पाचशे रुपये रोख देऊन गौरविण्यात आले होते. मात्र त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कार रखडल्याचे सांगण्यात आले. आचारसंहिता संपल्यानंतरही शासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप डी. ए. धनगर यांनी केला आहे. संबंधित महिलांना पुरस्कार देण्याचा सोयीस्कर विसर पडला असून, त्यामुळे महिलांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच शासन आदेशाचाही अनादर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर्षी तरी ग्रामीण भागातील कर्तबगार महिलांवर अन्याय होऊ नये आणि ग्रामपंचायतींमार्फत पात्र महिलांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जातात, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी अपेक्षा डी. ए. धनगर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply