पहिल्याच पावसात पालिकेच्या नियोजनाचा फज्जा; गणेश कॉलनीतील घरांत शिरले गटारीचे घाण पाणी

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत. गणेश कॉलनीतील इच्छापूर्ती गणपती मंदिरासमोरील परिसरात गटारीचे घाण पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांचे मोठे हाल झाले असून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागातील गटारी अरुंद असून त्यांना आवश्यक उतार नसल्याने परिसरातील तसेच आजूबाजूच्या कॉलनीमधील पावसाचे पाणी एकवटून याच ठिकाणी साचते. परिणामी, पावसाच्या वेळी गटारी तुंबून घाण पाणी घरांमध्ये शिरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे हा परिसर हॉस्पिटल झोनमध्ये येत असल्याने विविध दवाखान्यांमधून निर्माण होणारा वैद्यकीय कचराही या पाण्यासोबत वाहून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. यासंदर्भात नगरपरिषदेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पहिल्याच पावसात शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेची पोलखोल झाल्यानंतर तरी नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गणेश कॉलनीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *