
कत्तलीसाठी गोऱ्हा नेताना तिघे रंगेहात पकडले; संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात कत्तलीसाठी गोऱ्हा वाहतूक करताना गो रक्षकांनी रंगेहात पकडल्याने पोलिसांनी ताडेपुरा येथील एक व तालुक्यातील वासरे येथील दोघा अशा तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक १४ मार्च रोजी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास कॉन्स्टेबल अविनाश भदाणे हे शाहआलम नगर परिसरातील आयटीआय महाविद्यालयाजवळ गस्त घालत असताना गो रक्षक सचिन महाजन आणि पवन बारी यांनी त्यांना माहिती दिली की वाहन क्रमांक एमएच ५४ ओ १२२ या वाहनातून एक गोऱ्हा कत्तलीसाठी नेण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली. चौकशीत चालकाकडे गोऱ्ह्याच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी किंवा वैद्यकीय तपासणीचे कागदपत्र नसल्याचे आढळून आले. वाहन चालकाने आपले नाव बंटी उर्फ विजय कैलास धनगर (वय २२, रा. ताडेपुरा) असे सांगितले.
दरम्यान, गोऱ्ह्याचे मालक म्हणून वासरे येथील नामदेव परमेश्वर पाटील (वय ३५) आणि शरद रतीलाल पाटील (वय २५) यांची नावे समोर आली. चौकशीत त्यांनी पैशांची गरज असल्यामुळे हा गोऱ्हा मोईन नावाच्या व्यक्तीस विकण्यासाठी नेत असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११ (१) ई, ११ (१) ड, ११ (१) फ, ११ (१) क तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३ (५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद काकळीझ करीत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply