चारायला दिलेल्या तीन गायी गुराख्यांनी परस्पर विकल्या; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांनी चारण्यासाठी विश्वासाने दिलेल्या तीन गायी गुराख्यांनी परस्पर विकून टाकल्याची धक्कादायक घटना अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन गुराख्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील राजेंद्र सुपडू पाटील यांनी आपली एक गाय चारण्यासाठी सागर श्याम परदेशी (रा. राजाराम नगर) आणि भैय्या भगत (रा. बोरसे गल्ली) या दोघा गुराख्यांकडे दिली होती. त्याचप्रमाणे निलेश प्रकाश सूर्यवंशी आणि कृष्णा रतन ठाकरे यांनीही आपापल्या प्रत्येकी एक गायी या दोघांकडे चारण्यासाठी सोपविल्या होत्या. काही दिवसांनंतर राजेंद्र पाटील यांची गाय परत न आल्याने त्यांनी सागर परदेशी आणि भैय्या भगत यांच्याकडे विचारणा केली. मात्र, संबंधित गुराख्यांनी गाय कुठेतरी पळून गेल्याचे सांगून आपल्याला काही माहिती नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे काही दिवस शेतकरी संभ्रमात होते. दरम्यान, १२ मार्च रोजी रात्री सुमारे साडेबारा वाजता राजेंद्र पाटील यांच्या एका मित्राने त्यांना माहिती दिली की संबंधित दोघा गुराख्यांनी त्यांची गाय कोणालातरी विकून टाकली आहे. या माहितीची खात्री केल्यानंतर पुढील चौकशीत कृष्णा ठाकरे आणि निलेश सूर्यवंशी यांच्या गायी देखील त्याच दोघांनी विकून टाकल्याचे समोर आले.

या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून विश्वासाने दिलेल्या जनावरांची अशी फसवणूक झाल्याने परिसरात चर्चा रंगली आहे. याप्रकरणी राजेंद्र सुपडू पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सागर श्याम परदेशी आणि भैय्या भगत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *