
ऐंशी फुटी रस्त्यावर डुकराचा महिलेवर हल्ला; एका आठवड्यात तिसरी घटना, नागरिकांत पसरली भीती
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळेस फिरणाऱ्या एका महिलेवर डुकराने अचानक मागून हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट जनावरांच्या वाढत्या त्रासाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील मुंदडा नगर ते आर. के. नगर या परिसरातील ऐंशी फुटी रस्त्यावर दररोज रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान महिला व पुरुष मोठ्या संख्येने पायी फिरण्यासाठी येत असतात. मंगळवारी रात्री महावीर नगर येथील योगिता सहदेव पाटील या आपल्या मुलीसोबत फिरत असताना अचानक मागून आलेल्या डुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डुकराने त्यांच्या गुडघ्याच्या मागील बाजूस चावा घेतल्याचे सांगण्यात आले. हल्ला इतका भयावह होता की, सोबत असलेल्या मुलीने धाडसाने प्रतिकार करत आईला वाचवले. त्यानंतर आरडाओरड करत तिने नागरिकांची मदत मागितली व आईला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
एका आठवड्यात तिसरी घटना
शहरात मोकाट डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ऐंशी फुटी रस्त्यावर गेल्या एका आठवड्यात घडलेली ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांना मोकाट कुत्रे, डुकरे आणि जनावरांचा वाढता त्रास सहन करावा लागत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
डुक्कर पालन करणाऱ्यांना दिल्या नोटीसा
“गावात फिरणारे मोकाट जनावरांबाबत नोटीसा दिल्या आहेत, मोकाट कुत्र्यांवरही बंदोबस्त करण्यात येणार असून प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक नोडेल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी त्या शालेय परिसरातील माहिती दिल्यास बंदोबस्त करण्यात येईल. शहरातील डुक्कर पालन करणारे यांना नोटीसा देण्यात आली आहे. त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”
-किरण कंडारे, स्वच्छता निरीक्षक, नगर पालिका अमळनेर

Leave a Reply