गायत्री मंदिर परिसरातील बांबूच्या झाडांना आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गायत्री मंदिर परिसरात बांबूच्या झाडांना आग लागल्याची घटना घडली. आग लागलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळ पेट्रोल पंप असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नगरपरिषद अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गायत्री मंदिर परिसरातील बांबूच्या झाडांना अचानक आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. आग वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या जवळच पेट्रोल पंप असल्यामुळे आग आणखी भडकली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रताप साळी यांनी तातडीने नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी फारूक शेख, वासिम पठाण आणि मच्छिंद्र चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने कोणताही विलंब न करता आग विझविण्याचे काम सुरू केले. कर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे आग पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी वित्तहानीही टळली आहे. अग्निशमन दलाच्या वेळेवर आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *