पाणी हा हक्क, भीक नाही! अमळनेरात पाणीटंचाईविरोधात २२ जून रोजी शहर विकास आघाडीचा मोर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर शहर विकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत २२ जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत, प्रत्यक्षात आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याचा आरोप आघाडीने केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहर विकास आघाडीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेरकरांसमोर सध्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पालिकेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. नागरिकांकडून नियमित पाणीपट्टी वसूल केली जात असतानाही पुरेसा व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

पालिकेने निवडणुकीपूर्वी दोन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही अनेक भागांत आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आता नागरिकांच्या जगण्या-मरण्याचा विषय बनला असून सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोपही आघाडीने केला आहे.

निवेदनात शहरातील इतर नागरी समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे, भूयारी गटारींच्या कामामुळे झालेली गैरसोय, स्वच्छतेचा अभाव, तुंबलेल्या गटारी, वाढती दुर्गंधी आणि बंद असलेले पथदिवे यामुळे नागरिकांचे जीवनमान खालावल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक साफसफाईचे नियोजन न झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नियमित बैठका घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सर्व प्रश्नांवर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ जून रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात नागरिकांनी हांडे व मडकी घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन शहर विकास आघाडीने केले आहे.

“हा लढा केवळ पाण्यासाठी नाही, तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि अमळनेरच्या सन्मानासाठी आहे,” असे सांगत आघाडीने अमळनेरकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *