
अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व व्यवस्थापन समितीवर निलेश महाले पाटील यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अमळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी नव्याने सनियंत्रण व व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अमळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य निलेश लक्ष्मण महाले पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता पुरुष प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार समितीची स्थापना करण्यात आली असून रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य उपक्रमांना गती देणे आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणे ही समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. निलेश महाले पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सहकार व जनहिताच्या क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि व्यापक लोकसंपर्काचा लाभ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, स्वच्छता, औषध उपलब्धता, माता-बाल संगोपन, रोगप्रतिबंधक कार्यक्रम तसेच विविध आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक सचिन बाळू पाटील, शेतकी संघ संचालक गणेश भामरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी निलेश महाले पाटील यांचे अभिनंदन केले आहे. निलेश महाले पाटील यांच्या निवडीमुळे अमळगाव ग्रामीण रुग्णालयाच्या सेवा अधिक परिणामकारक होतील तसेच रुग्णांच्या प्रश्नांना सक्षमपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अशी आहे समिती
समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून पंचायत राज संस्थांचे दोन प्रशासक, एनजीओ प्रतिनिधी संजय कावडे, महिला सामाजिक कार्यकर्त्या पूनम राहुल पवार आणि निलेश लक्ष्मण महाले पाटील यांचा समावेश आहे. पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव, गट विकास अधिकारी अमळनेर, उपअभियंता बांधकाम विभाग, पशुसंवर्धन अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अमळगाव हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

Leave a Reply