विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांवर ग्रामस्थांचा आक्षेप; नियमबाह्य नियुक्त्या रद्दची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील विविध गावांमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पदावर करण्यात आलेल्या नियुक्त्या शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप करत संबंधित नियुक्त्यांची तातडीने चौकशी करून त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करणखेडे ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी, अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या ३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी आवश्यक पात्रता, अटी आणि निवड निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये या निकषांचे पालन न करता नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनानुसार, शासनाच्या नियमांप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्यांमध्ये किमान ३३ टक्के महिला प्रतिनिधित्व असणे अपेक्षित आहे. मात्र प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीत एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच समाजातील सर्व घटकांना समान संधी देण्याच्या शासनाच्या तरतुदींचेही उल्लंघन झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. याशिवाय संपूर्ण निवड प्रक्रिया गुप्तपणे आणि पारदर्शकतेचा अभाव ठेवून राबविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित गावांमध्ये कोणतीही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली नाही किंवा इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले नाहीत. त्यामुळे अनेक पात्र नागरिकांना संधीपासून वंचित राहावे लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही नियुक्त व्यक्तींच्या पात्रता आणि चारित्र्य पडताळणीबाबतही प्रशासनाची दिशाभूल झाल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यातील सर्व गावांमधील विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांची सखोल चौकशी करून नियमबाह्य नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात तसेच भविष्यात अशा नियुक्त्या शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आणि पूर्ण पारदर्शकतेनेच करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना शरद धनगर, गजानन कोळी, गणेश गुरव, विशाल सास्के, देवेंद्र पाटील आणि प्रमोद पवार उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी जळगाव, जळगाव ग्रामीणचे खासदार, अमळनेरचे आमदार तसेच तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *