
अमळनेर तालुक्याचा दहावीचा निकाल ९१.८८ टक्के
१६ शाळांनी गाठली निकालाची शंभरी; सेंट मेरीचा प्रांजल दुसाने तालुक्यात प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) दहावीच्या परीक्षेत अमळनेर तालुक्याने यंदाही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. सेंट मेरी इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा प्रांजल आनंद दुसाने याने ९९.४० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूलची कल्याणी युवराज चौधरी हिने ९८.४० टक्के गुणांसह द्वितीय तर सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा यशमीत समाधान खैरनार याने ९८.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
अमळनेर तालुक्यातील ७४ शाळांमधील ३ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा तालुक्यातील तब्बल १६ शाळांनी यंदा शंभर टक्के निकालाची कामगिरी नोंदवली आहे. यात पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल (अमळनेर), महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल (देवगाव), माध्यमिक विद्यालय (कुऱ्हे), एस. एच. मुंदडे हायस्कूल (मारवड), स्व. एस. जी. सोनवणे माध्यमिक विद्यालय (भरवस), नंदादीप माध्यमिक विद्यालय (निम), एकात्मता माध्यमिक विद्यालय (शहापूर), नूतन माध्यमिक विद्यालय (अंतुर्ली रंजाणे), सतगुरु पब्लिक स्कूल (चोपडाई), यशवंत आदिवासी आश्रमशाळा (पिंपळे बु.), आर्मी स्कूल (अमळनेर), माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा (ताडेपुरा), सेंट मेरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल (अमळनेर), माध्यमिक विद्यालय (बोहरे), माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा (अंतुर्ली रंजाणे) आणि एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल (अमळनेर) या शाळांचा समावेश आहे. यावर्षीदेखील तालुक्यात मुलींनी निकालात आघाडी घेत मुलांपेक्षा सरस कामगिरी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शाळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply