छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

६०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती;  विविध योजनांचा लाभ व प्रमाणपत्रांचे वितरण

 

अमळनेर (प्रतिनिधी) ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत नगरपरिषद अमळनेर येथे समाधान शिबिर झाले. या शिबिराला अमळनेर मंडळातील अमळनेर, मंगरूळ, धार, मालपूर, रंजनगाव आणि अंतुर्ली येथील सुमारे ६०० ते ६५० नागरिकांनी उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवासी नायब तहसीलदार एस. वाय. पाटील, पुरवठा निरीक्षण अधिकारी आर. जे. शेख, महिला व बालकल्याण अधिकारी प्रेमलता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागांकडून स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. त्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज व विविध योजनांबाबत मार्गदर्शन करून समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. पुरवठा शाखेमार्फत १५ नवीन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. तसेच १० नाव कमी करण्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली. याशिवाय ६५ राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वाटप, १ डेटाबेस प्रक्रिया पूर्ण, २ हयात प्रमाणपत्रे, ४ संजय गांधी निराधार योजना लाभ, ४१ श्रावणबाळ योजना लाभ, ४ फेरफार निकाल, १२४ दुरुस्त ७/१२ उतारे तसेच ३७७ ई-७/१२ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. सेतू शाखेमार्फत ६९ उत्पन्न दाखले, ५६ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे, ५० रहिवासी दाखले, १२ जात प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच ५९ आधार नोंदणी व आधार दुरुस्तीची कामे करण्यात आली. महिला व बालविकास विभागाकडून ३० लाभार्थ्यांना बेबी किटचे वाटप करण्यात आले. तसेच ४ विद्यारंभ प्रमाणपत्रे, २५ प्रधानमंत्री मातृत्व योजना लाभ, १० लेक लाडकी योजना लाभ देण्यात आले. पोषण आहाराचेही वितरण करण्यात आले. कृषी विभागामार्फत ४ शेती अवजारांचे वाटप करण्यात आले, तर महावितरणतर्फे ७ नवीन वीज जोडणी आदेश देण्यात आले.

या समाधान शिबिरात नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेत प्रशासनाच्या उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी संजय गांधी योजना नायब तहसीलदार राजेंद्र ढोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *