पूराला सव्वामहिना उलटला; आश्वासनांचा पाऊस थांबेना, मात्र मदतीचा एक रुपया ही मिळेना!

अमळनेरच्या पूरग्रस्तांना दहा हजारांची प्रतीक्षा; पिंपळे नाल्याच्या अतिक्रमणांवरही कारवाई रखडल्याने नागरिकांचा संताप

अमळनेर (प्रतिनिधी) : ३१ जुलैच्या अतिवृष्टीने पिंपळे नाल्याला आलेल्या महापुराने अमळनेर शहरातील अनेक कुटुंबांच्या संसाराची मोठी हानी केली. पुराचे पाणी ओसरले, पंचनामे पूर्ण झाले, नुकसानग्रस्तांना किराणा किटही मिळाले; मात्र शासनाने जाहीर केलेल्या दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. पुराच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही मदतीचा पैसा खात्यावर जमा न झाल्याने पूरग्रस्तांमध्ये नाराजी असून, आता आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदतीची मागणी जोर धरत आहे.

पुरानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल दादा पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अमळनेरमध्ये येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही आर्थिक मदत मिळाली नसल्याने या आश्वासनांचा पाठपुरावा नेमका कुठपर्यंत पोहोचला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

दहा हजारांची मदत कधी मिळणार?

 

मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्तांना पाच हजारांऐवजी दहा हजार रुपयांची तातडीची मदत मिळणार असल्याचे सांगितले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दहा हजार रुपयांची आश्वासित मदत अद्याप पूरग्रस्तांच्या खात्यावर का जमा झाली नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पूराच्या काळात पाहणीसाठी मंत्री, खासदार, आमदार आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आता त्याच ताकदीने शासनदरबारी पाठपुरावा करून आर्थिक मदत मिळवून देणे अपेक्षित आहे. केवळ पाहणी, आश्वासन आणि प्रसिद्धी नको; तर पूरग्रस्तांच्या हातात प्रत्यक्ष मदत हवी, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

 

पिंपळे नाल्याच्या अतिक्रमणांचा प्रश्न कायम

 

पूरानंतर पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नाल्याचे नैसर्गिक पात्र अरुंद होणे आणि पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होणे यामुळे भविष्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांना आहे. पुरानंतर अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी झाली होती. मात्र महिनाभरानंतरही प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई झालेली नसल्याने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशांचे पुढे काय झाले, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

पिंपळे नाल्याचे अधिकृत मोजमाप करून हद्द निश्चित करणे, अतिक्रमित जागांची पाहणी करणे, नाल्याचे पात्र मोकळे करणे आणि भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी नगरपालिका, प्रांत कार्यालय, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

 

‘हात ओले’ केल्याच्या आरोपांची चर्चा

 

दरम्यान, पिंपळे नाल्यालगतच्या बांधकामांवर व अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याबाबत बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताच्या चर्चाही अमळनेरमध्ये सुरू आहेत. काही अधिकाऱ्यांचे ‘हात ओले’ केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी अतिक्रमणांवर कारवाई का रखडली, याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

एकीकडे २०२४ नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करून किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे, तर दुसरीकडे दहा हजार रुपयांच्या मदतीचे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. अतिक्रमणांच्या प्रश्नावर मोजमाप व सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कागदी प्रक्रियेपेक्षा प्रत्यक्ष कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

आता पाहणी नको, आश्वासन नको; प्रत्यक्ष मदत आणि कायमस्वरूपी उपाय हवा!”

दहा हजार रुपयांची आश्वासित मदत तातडीने वितरित करावी, पात्र नुकसानग्रस्तांना नियमानुसार मदत द्यावी आणि पिंपळे नाल्याचे मोजमाप पूर्ण करून अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पुढील पुराची वेळ येण्यापूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, की पुन्हा एकदा केवळ आश्वासनांचाच पाऊस पडणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

१८ नुकसानग्रस्तांना मदत लवकरच

 

“शहरातील २०२४ पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करून सर्वांना किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. पुरामुळे पडझड झालेल्या १८ नुकसानग्रस्तांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत लवकरच डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात नगरपरिषद, भूमी अभिलेख व महसूल विभागाची संयुक्त समिती स्थापन करून मोजमाप करण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.”

मयूर भंगाळे, प्रांताधिकारी, अमळनेर

 

अतिक्रमणांच्या सर्वेक्षणासाठी एजन्सी नियुक्त

 

“शहरातील २०२४ पूरग्रस्तांचे पालिकेकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले असून सर्वांना किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे पडझड झालेले १८ नुकसानग्रस्त आहेत. पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात जनरल सभेत ठराव करण्यात आला आहे. गाव नकाशा व ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून काम सुरू करण्यात आले आहे.”

गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *