स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त अमळनेर तालुका देशभक्तीने दुमदुमला

अमळनेर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींमध्ये देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तिरंगा रॅली, ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धनाचे संदेश आणि राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला.

 

सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलची भव्य तिरंगा रॅली

 

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, मंगरूळ, अमळनेर यांच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

रॅलीची सुरुवात अमळनेर शहरातील राजभवन येथून करण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्साहात सहभाग नोंदविला. राजभवन, मंगलमूर्ती मार्ग, सुभाष चौक आणि तिरंगा चौक या मार्गावरून रॅली मार्गक्रमण करत नागरिकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. सुभाष चौक तसेच तिरंगा चौक येथे विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले. या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून “हर घर तिरंगा, हर मन तिरंगा” यासह राष्ट्रप्रेम, एकता आणि देशाप्रती कर्तव्याची भावना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रॅलीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे चेअरमन सुरेंद्रकुमार बोहरा, डॉ. गौरव बोहरा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक जितेंद्र सिंह, मयूर बारसकर, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

चिमणपुरी-पिंपळे खुर्दमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

 

भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या संकल्पाची जोड देण्यात आली. पिंपळे बुद्रुक येथील कै. सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालयात केंद्रप्रमुख तथा गटसमन्वयक अधिकारी रवींद्र पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अमळनेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कदम, ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पिंपळे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा राहुल पाटील, उपसरपंच योगेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी-पिंपळे खुर्द विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. युवराज पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. आर. पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी. बी. पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिमणपुरी-पिंपळे येथील मुख्याध्यापक राजेंद्र बागुल यांच्यासह शिक्षक सुरेश पाटील, विजया पाटील, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, श्रद्धा पाटील, रेखा पाटील व सीमा पाटील यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

 

कॉपीमुक्त अभियान व निसर्ग संवर्धनाची शपथ

 

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियान तसेच निसर्ग संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. परीक्षेतील प्रामाणिकपणा, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. युवराज पाटील यांचे वडील आबासो. डी. आर. पाटील यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, मान्यवर, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले. दूध वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

देशभक्ती, सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि विकासाचा संदेश देत “विकसित गाव, सक्षम नागरिक आणि समृद्ध भविष्य” या दिशेने एकजुटीने वाटचाल करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

 

सरस्वती शिशुवाटिकेत देशभक्तीपूर्ण वातावरण

 

अमळनेर येथील सरस्वती शिशुवाटिका पूर्व प्राथमिक शाळेत भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानाचार्य किरण भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी राष्ट्रगान, राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन केले. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सुभेदार किशोर ठाकरे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह अॅड. विशाल महाजन उपस्थित होते. सुभेदार किशोर ठाकरे यांनी आपल्या सैनिकी सेवाकाळातील विविध मोहिमा व अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील सहभागाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. सैनिकी सेवेत तरुणांनी सहभागी व्हावे यासाठी लहानपणापासूनच तयारी व देशसेवेची भावना जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. विशाल महाजन यांनी शालेय जीवनात मिळालेले संस्कार व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात उपयुक्त ठरतात, असे सांगितले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्कारक्षम वातावरण देणाऱ्या शाळांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

चिमुकल्यांनी साकारल्या राष्ट्रीय नेत्यांच्या भूमिका

 

सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी भारत माता, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, पंडित जवाहरलाल नेहरू, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, सैनिक, पोलीस आदी भूमिका साकारत त्यांच्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. तसेच सामूहिक व वैयक्तिक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास पालक बंधू-भगिनी, इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त रविंद्र पाटील, दिनेश नाईक, मनोहर सोनवणे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात आम्रपाली संदानशिव यांनी स्वागतगीत सादर केले. माहेश्वरी राजपूत व काजल राठोड यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रधानाचार्य किरण भदाणे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *