मागील वादातून दोन गटांत तुफान दंगल; चाकू, लोखंडी सळई व काठ्यांच्या हल्ल्यात सात जण झाले जखमी

खवशी येथे घडली घटना; दोन्ही गटांतील  ११ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल

 

अमळनेर (प्रतिनिधी) मागील भांडणाच्या कारणावरून तालुक्यातील खवशी येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दंगलीत चाकू, लोखंडी सळई, फायटर आणि काठ्यांचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटांतील सात जण जखमी झाले. ही घटना १३ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण ११ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने पोलिसांकडून घटनेचा सर्वंकष तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, खवशी येथील सीमा अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा पुतण्या प्रतीक जगतराव पवार हा १३ जून रोजी गुरांना पाणी पाजण्यासाठी सार्वजनिक हाळावर गेला असता त्याचा दर्शन भूषण गोसावी, भूषण सुरेश गोसावी आणि दीपक उर्फ कांतीलाल सुरेश गोसावी यांच्याशी मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली होती. गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता.

मात्र रात्री साडेनऊ वाजता सीमा पवार या घरासमोर ओट्यावर बसलेल्या असताना दीपक, भूषण, दर्शन, कल्याणी कांतीलाल गोसावी, रुपाली भूषण गोसावी तसेच त्यांच्या सोबत खेडी, नांद्री, अमळगाव, अमळनेर व गांधली येथील सुमारे वीस ते पंचवीस जण तेथे आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यावेळी जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ सुरू झाल्यानंतर सुलभा दिनकरराव पवार व शालुबाई जगतराव पवार या महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भूषण गोसावी याने हातातील चाकूने सुलभा पवार यांना मारहाण करून खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दीपक गोसावी याने शालुबाई पवार यांच्या डाव्या हाताच्या बोटावर चाकूने वार केला, तर दर्शन गोसावी याने सीमा पवार यांच्या तळहातावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरडाओरडा झाल्यानंतर जगतराव मधुकर पवार, दिनकर मधुकर पवार आणि प्रतीक पवार हे भांडण सोडविण्यासाठी आले असता काही अनोळखी व्यक्तींनी प्रतीक याला धरून ठेवून त्याच्यावर फायटर व काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यांना नर्मदा मेडिकल फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या फिर्यादीवरून पोलिसांनी गोसावी कुटुंबातील पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११५(२), ३५१(२), ३५२, २९६, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत कलम ३(१)(आर), ३(१)(एस) व ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या गटातील दर्शन भूषण गोसावी यांनीही अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते, त्यांचे वडील भूषण गोसावी आणि काका दीपक गोसावी हे प्रतीक पवारच्या वडिलांना त्याच्या वर्तनाबाबत समजावण्यासाठी गेले असता वाद निर्माण झाला.

यावेळी शालुबाई जगतराव पवार व सीमा अशोक पवार यांनी भूषण गोसावी यांची गच्ची धरली, तर दर्शन गोसावी याला खाली पाडण्यात आले. त्यानंतर जगतराव मधुकर पवार यांनी लाकडाने भूषण गोसावी यांच्या पाठीवर व मानेवर मारहाण केली. प्रतीक पवार याने दर्शनच्या डोक्यात वीट मारली, तर राज अनिल शिरसाठ याने लोखंडी सळईने डोक्यावर वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच दगडू नाना शिरसाठ यांनीही लोखंडी सळईने मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दीपक गोसावी यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून भांडण थांबविल्यानंतरही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रतीक पवार, जगतराव पवार, राज शिरसाठ, दगडू शिरसाठ, शालुबाई पवार आणि सीमा पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५), १८९(२), १९०, १९१(२) व १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *