टाकरखेडा शिवारातून दोन गायींची चोरी; अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकरखेडा येथील दोन शेतकऱ्यांच्या दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १४ ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली आहे. या चोरीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले असून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील पाटील यांच्या शेतातील सुमारे ४ हजार ५०० रुपये किमतीची गाय तसेच छोटू ईश्वरलाल पाटील यांच्या शेतातील ५ हजार ५०० रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री २.२५ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान टाकरखेडा शिवारात घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *