
अमळनेरमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) : अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (एएडीएम) आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व सीपीआरचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका अनुरूपा अभिजीत भांडारकर होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. सागराज चव्हाण, प्रा. डॉ. अस्मिता सर्वया, प्रा. डॉ. भरत खंडागळे तसेच ग्रंथपाल उदय महाजन उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात नंदुरबार येथील आशिष वाणी यांनी ‘आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. धुळे येथील डॉ. धनश्री साळुंखे यांनी प्रथमोपचार व सीपीआरचे प्रशिक्षण दिले. यामध्ये रक्तस्त्राव थांबविणे, भाजणे, फ्रॅक्चर, विजेचा धक्का, सीपीआर, बचाव तंत्र, स्ट्रेचर तयार करणे, दोरीच्या गाठी बांधणे, अग्निशमन तसेच सुरक्षित स्थलांतर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागींची ‘डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर’ (डीएमव्ही) म्हणून ओळख निर्माण होणार असून, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्णतः विनामूल्य असून सर्वसामान्य नागरिकांनाही त्यात सहभागी होता येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. प्रा. डॉ. अनिता खेडकर आणि प्रा. धनराज ढगे यांनी प्रशिक्षणाचे समन्वयन केले. ज्योती सोनार, कोमल सूर्यवंशी आणि महेश शेलार यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनात सहकार्य केले. या प्रशिक्षणात विद्यार्थी आणि प्राध्यापक मिळून ६५ जण सहभागी झाले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी वसंतसिंह बापू पाटील, डॉ. संजीवसिंह चव्हाण, डॉ. अंजली वीरा चव्हाण, स्वप्नीलसिंह मोरे, प्रशांतसिंह लगरे आणि मोनाली वीरा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply