शासकीय कार्यालयांत अभ्यागतांसाठी आता दुपारी ३ ते ५ भेटीची वेळ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमळनेर (प्रतिनिधी) : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी व अधिकाऱ्यांना भेटणे सुलभ व्हावे, यासाठी आता अभ्यागतांसाठी दुपारी ३ ते ५ ही भेटीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांनी दूरचित्रवाणी बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना याबाबत आदेश दिले आहेत.

महसूल मंत्र्यांनी ४ सप्टेंबर रोजी दूरचित्रवाणी बैठक घेतली होती. या बैठकीत शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व अभ्यागतांना अधिकाऱ्यांची भेट घेणे सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर दुपारी ३ ते ५ ही अभ्यागत भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले.

या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख, उपविभागीय अधिकारी, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागतांच्या भेटीची वेळ दर्शविणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत आपल्या कार्यालयाबाहेर दुपारी ३ ते ५ ही अभ्यागत भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी निश्चित वेळ उपलब्ध होणार असून, शासकीय कामकाजात नागरिकाभिमुखता वाढण्यास मदत होणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *