
बालस्नेही उपक्रमाला गती; अमळनेर तालुक्यात तीन गावांत बैठकांमधून जनजागृती
अमळनेर (प्रतिनिधी) : बालक व महिलांचे हक्क, संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या बालस्नेही ग्रामपंचायत उपक्रमाला अमळनेर तालुक्यात गती मिळाली आहे. यशदा, युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील १०२ ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत २४ ऑगस्ट रोजी उदयनगर, पिंपळे खुर्द आणि गाधली येथे बैठका घेण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य अॅड. संजय सेंगर यांनी या बैठकींमध्ये उपस्थित राहून बालिका स्नेही पंचायत उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. मार्च-एप्रिल २०२६ मध्ये बालस्नेही ग्रामपंचायती विषयक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष उपक्रमांना सुरुवात झाली आहे. दौऱ्यात सकाळी ११ वाजता उदयनगर, दुपारी १ वाजता पिंपळे खुर्द आणि दुपारी ४ वाजता गाधली येथे बैठका घेण्यात आल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी व आशा सेविका, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, ग्राम बाल संरक्षण समिती, महिला बचत गट, शाळा व्यवस्थापन समिती, बालसभा व बाल पंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बालक व महिलांचे प्रश्न, बालिकांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सुरक्षितता यावर सविस्तर चर्चा झाली. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांनी महिलांच्या तसेच बालकांच्या विविध समस्या मांडल्या.
या प्रश्नांवर अॅड. संजय सेंगर यांनी मार्गदर्शन करून संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. बालकांचे हक्क आणि महिलांचे संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी नरेंद्र पाटील, अध्यक्ष, साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर, जळगाव जिल्हा, तसेच प्रवीण, यशदा पुणे येथील प्रशिक्षक आणि सबगव्हाणचे माजी सरपंच उपस्थित होते. बालिका स्नेही पंचायत उपक्रमामुळे गावपातळीवर बालक व महिलांच्या प्रश्नांना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण होण्यास मदत होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Leave a Reply