ईद-ए-मिलाद-उन-नबीचा अमळनेरात भव्य जुलूस; हजारो समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी)पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त बुधवारी अमळनेर शहरात भव्य जुलूस काढण्यात आला. शहरातील विविध भागांतून निघालेल्या या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील हजारो समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

दुपारी २ वाजेनंतर कसाली मोहल्ला, शाहआलम नगर, इस्लामपुरा, झामी चौक, पान खिडकी, अंदरपुरा, बाहरपुरा, गांधलीपुरा, जापान जिन, श्रद्धानगर, जोशीपुरा, मिल चाल, तांबेपुरा यासह विविध भागांतून जुलूस निघाला. हातात इस्लामी झेंडे घेत समाजबांधवांनी नात-ए-पाकचे पठण करत पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त केली. जुलूसच्या मार्गावर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

 

ईदगाह मैदानावर असरची नमाज

 

सायंकाळी सुमारे ५ वाजता जुलूस ईदगाह मैदानावर पोहोचला. याठिकाणी समाजबांधवांनी एकत्रितपणे असरची नमाज अदा केली. ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल यावेळी पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते तसेच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या नियोजनाबद्दल समाजबांधवांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाचे आभार मानले.

 

मस्जिदी, मोहल्ल्यांमध्ये आकर्षक रोषणाई

 

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पार्श्वभूमीवर शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची तयारी सुरू होती. शहरातील अनेक मस्जिदी तसेच मोहल्ल्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी रोषणाईने उजळलेले परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

 

जयनील फाउंडेशनकडून पाण्याचे वाटप

 

जुलूसमध्ये सहभागी नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडले. पाच कंदील चौक येथे जयनील फाउंडेशनतर्फे जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. उन्हाच्या वातावरणात पाण्याची व्यवस्था केल्याने सहभागी नागरिकांना दिलासा मिळाला. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. यावेळी नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक फिरोज मिस्तरी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जनाब नासिर हाजी, जितू भाऊ ठाकूर, वरुण पाटील, शकील काझी, अझहर सय्यद, जुनेद शेख, मोईज सय्यद, जाकीर शेख, अस्लम तेलोरे, नबी दादा, अझहर शेख, वसीम पठाण, उझैफ पठाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमन, शांती आणि भाईचाऱ्याचा संदेश देत ईद-ए-मिलाद-उन-नबीचा जुलूस उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडला. आयोजन यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाजबांधवांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *