
वाहतूक नियमभंग करणाऱ्या ७७१ वाहनांवर कारवाई; ७ लाख ९२ हजार रुपयांचा दंड केला वसूल
अमळनेर विभागात दीड महिन्याची विशेष मोहीम; नियमांचे पालन करण्याचे डीवायएसपी विनायक कोते यांचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विभागातील वाहतूक पोलिसांनी गेल्या दीड महिन्यात विशेष मोहीम राबवत ७७१ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईतून सुमारे ७ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती डीवायएसपी विनायक कोते यांनी दिली. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे, हेल्मेटचा वापर न करणे, रस्त्यावर कोठेही वाहन उभे करणे तसेच ब्रेक नसलेली किंवा खराब वाहने रस्त्यावर आणणे यांसारख्या कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळण्याबरोबरच वैद्यकीय खर्चातही मोठी वाढ होत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी अमळनेर, पारोळा, एरंडोल आणि मारवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर मोहीम राबविली.
अमळनेर पोलीस हद्दीत मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ अंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २० वाहनांवर, कलम १८५ अंतर्गत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या १६ वाहनचालकांवर तसेच इतर ४०१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामधून ४ लाख ८९ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पारोळा पोलीस हद्दीत कलम ६६/१९२ अंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांवर, मद्यपान करणाऱ्या ४ वाहनचालकांवर आणि इतर ६५ वाहनांवर कारवाई करून ६० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम ६६/१९२ अंतर्गत १४ वाहनांवर, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या १६ वाहनचालकांवर आणि इतर १५२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १ लाख ३२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर मारवड पोलीस हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७ वाहनांवर तसेच इतर ६७ वाहनांवर कारवाई करून १ लाख १० हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला.
अवैध प्रवासी वाहतूक, कर्कश सायलेन्सरचा वापर, मद्यपान करून वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे तसेच रस्त्यावर कुठेही वाहने उभी करणाऱ्यांवर सुरुवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागेल
“अवैध प्रवासी वाहतूक करणारी आणि कर्कश सायलेन्सर वाजवणारे, दारू पिऊन वाहन चालवणारे, अतिशय वेगात वाहन चालवणारे, रस्त्यात कुठेही पार्किंग करणाऱ्यांवर सुरुवातीला दंडात्मक कारवाई केली आहे. नागरिकांवर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी असा उद्देश तू नियमांचे पालन होऊन शिस्त लागावी अपघात टाळावेत असा उद्देश आहे. मात्र आपल्यापैकी कोणाचा तरी जीव जात असेल तर नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागेल.”
– विनायक कोते, डीवायएसपी, अमळनेर विभाग

Leave a Reply