सूर्यकन्या तापीच्या तीरापासून वर्णेश्वराच्या चरणी; ‘बम बम भोले’च्या जयघोषात कावड यात्रा उत्साहात

जळोदच्या तापी तीरावरून आणले पवित्र जल; हजारो भाविकांच्या उपस्थितीत वर्णेश्वर महादेवाला अभिषेक

 

अमळनेर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अमळनेर शहरासह तालुक्यातील शेकडो महिला, पुरुष आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत पारंपरिक श्री वर्णेश्वर महादेव कावड यात्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. यंदा या कावड यात्रेने १२ वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला मोठा प्रतिसाद लाभला.

सकाळपासूनच शिवभक्तांनी जळोद येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात जाऊन तापीमाईचे विधिवत पूजन केले. त्यानंतर कावडीत पवित्र जल भरून ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात अमळनेरकडे प्रस्थान केले. ढोल-ताशांचा गजर, डीजेवरील भक्तिगीते आणि शिवभक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. रढावण, सुंदरपट्टी, हेडावे, नंदगाव, तासखेडा, सानेनगर, गांधली, अमळगाव तसेच अमळनेर शहरातील हजारो शिवभक्त यात्रेत सहभागी झाले होते. अनेक भाविक कावड खांद्यावर घेऊन नाचत-गात मार्गक्रमण करत होते. यात्रेतील शिवभक्तांचे स्वागत व दर्शन घेण्यासाठी शहरासह परिसरातील शेकडो भाविक जळोद मार्गावर उपस्थित होते. यात्रेदरम्यान नगरसेवक श्रीराम चौधरी यांनी शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. तसेच जळोद येथील सुनंदा चौधरी यांनी पोह्यांची तर गांधली येथील गजेंद्र साळुंखे यांनी चहाची व्यवस्था करून शिवभक्तांची सेवा केली. दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास सर्व कावडधारी शिवभक्त श्री वर्णेश्वर महादेव मंदिरात दाखल झाले. मंदिरात कावडीतील पवित्र जल भगवान महादेवाच्या चरणी अर्पण करून भाविकांनी दर्शन घेतले. श्रावण महिन्याच्या प्रारंभी पवित्र कावड यात्रेत सहभागी होऊन महादेवाच्या चरणी जल अर्पण केल्याने मनाला समाधान आणि पुण्य लाभल्याची भावना अनेक शिवभक्तांनी व्यक्त केली. यात्रेत जयश्री पाटील, वासुदेव देसले, जितेंद्र ठाकूर,पंकज मुंदडा, संदीप महाजन, प्रविण महाजन, अनिल महाजन, सचिन चौधरी, दिलीप बाविस्कर, निलेश चौधरी, तुषार पाटील, सुभाष चौधरी, निलेश साळुंखे, राहुल चौधरी, किरण पाटील, नरेंद्र चौधरी, चेतन राजपूत, प्रविण पाटील, रिता बाविस्कर, भूषण भदाणे, विक्रांत पाटील, सुरेश अर्जुन पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील आणि माधुरी पाटील यांच्यासह अनेक शिवभक्त सहभागी झाले होते. श्रावणातील कावड यात्रा ही अमळनेरच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग बनली असून दरवर्षी या यात्रेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्याचा लाभ घ्यावा व भगवान महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करावा, असे आवाहन वर्णेश्वर महादेव संस्थानचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी केले. यात्रा यशस्वी करण्यासाठी कावड यात्रेचे प्रमुख शिवभक्त सुभाष पाटील, भिकन वाडीले आणि सुशील भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचे आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *