के. डी. गायकवाड विद्यालयात पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प

अमळनेर (प्रतिनिधी) : के. डी. गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची पालक-शिक्षक सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेसाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत शिक्षकांशी सविस्तर संवाद साधला.

सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर होते. यावेळी शिक्षक-पालक सभेच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते श्रावण संदानशिव यांची निवड करण्यात आली.

सभेच्या प्रारंभी मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर यांनी विद्यालयाच्या मागील सहामाहीतील शैक्षणिक व सहशैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. विद्यार्थ्यांची उपस्थिती, परीक्षांतील निकाल, शिस्त, विविध स्पर्धांमधील यश तसेच विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी पालकांना दिली.

यावेळी शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगती, अभ्यासातील अडचणी आणि सुधारणेच्या संधी याबाबत पालकांशी सविस्तर चर्चा केली. तसेच डिजिटल शिक्षणाचे महत्त्व, मोबाईलच्या योग्य वापराविषयी जागरूकता, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या करिअर नियोजनाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. सभेदरम्यान पालकांनीही शाळेच्या वेळा, अभ्यासक्रम, गृहपाठ आणि परीक्षा पद्धतीबाबत आपली मते व सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि घर यांच्यात समन्वय व सहकार्य आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सभा यशस्वी करण्यासाठी शिक्षक-पालक सभेचे सचिव जे. एस. पाटील तसेच वरिष्ठ शिक्षक एम. आर. सोनवणे आणि इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *