
अमळनेरच्या वैद्यकीय सेवेचा गौरव; सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कार प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) : आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय वैद्यकीय सेवा, सेवाभावी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत अमळनेर येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘पुढारी आरोग्य रत्न २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात डॉ. अनिल शिंदे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ. अनिल शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर परिसरासह विविध भागांतील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली आहे. अनेक गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारांवरील उपचार तसेच जटिल स्वरूपाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून त्यांनी अनेक रुग्णांना नवजीवन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या वैद्यकीय कौशल्यासोबतच रुग्णांप्रती असलेला संवेदनशील दृष्टिकोन आणि सेवाभावी वृत्ती यामुळे त्यांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला आहे.
आरोग्यसेवा ही केवळ व्यवसाय न मानता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रुग्णसेवा करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाने घेतली. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून ‘पुढारी आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. नाशिक येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आणि संपादक राहुल रनाळकर यांच्यासह आरोग्य, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हजारो रुग्णांवर उपचार करताना गंभीर रुग्णांच्या जीवनासाठी निर्णायक भूमिका बजावणाऱ्या डॉ. अनिल शिंदे यांच्या वैद्यकीय कार्याला मिळालेला हा सन्मान त्यांच्या सेवाभावी कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची पावती मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्राची राज्यस्तरावरही दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील ३६ डॉक्टरांचा गौरव
उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ३६ डॉक्टरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अमळनेर तालुक्यातून पुरस्कार मिळविणारे डॉ. अनिल शिंदे हे एकमेव डॉक्टर ठरले. त्यामुळे त्यांच्या या सन्मानामुळे अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply