पोलिसांचा खबरी आहे’ म्हणत कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न; दादू धोबी अटकेत

अमळनेर (प्रतिनिधी) सराईत गुन्हेगार राजेश उर्फ दादू धोबी याने एकावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास गांधलीपुरा भागातील भरुचा वाईन शॉपजवळ घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी दादू धोबीला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, परेश रवींद्र उदेवाल (वय २८, रा. राजाराम नगर, शिरूड नाका) हे ५ सप्टेंबर रोजी रात्री गांधलीपुरा भागातून पायी जात असताना अचानक राजेश उर्फ दादू धोबी त्यांच्यासमोर आला. त्याने परेश यांना अश्लील शिवीगाळ करत, ‘‘तू पोलिसांचा खबरी आहेस, तुझ्यामुळे मला त्रास होत आहे,’’ असे म्हणत कमरेला लावलेला कोयता काढला आणि परेश यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. परेश यांनी तेथून पळ काढला असता दादू धोबीने त्यांचा पाठलाग सुरू केला. भरुचा वाईन शॉपजवळ त्याने परेश यांना अडवून त्यांच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परेश यांनी तत्काळ वळून वार चुकवला आणि आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावत आले व त्यांनी परेश यांची दादूच्या तावडीतून सुटका केली. यावेळी दादू धोबी नागरिकांवरही कोयता उगारून धमक्या देत असल्याने नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते व पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

परेश रवींद्र उदेवाल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात राजेश उर्फ दादू धोबी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०९ (१), ११५ (२), १२६ (२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दादू धोबीला अटक केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *