
ऊर्जा बचतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचा पुढाकार; मयूर भंगाळे इलेक्ट्रिक बाईकवरून पोहोचले कार्यालयात
आठवड्यातून दोन दिवस शासकीय वाहन वापरणार नाहीत; पर्यावरणपूरक उपक्रमाची शहरात चर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ऊर्जा बचत, इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश आता प्रशासन स्तरावरही प्रत्यक्ष कृतीतून दिसू लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस शासकीय वाहनाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून करत आज सकाळी आपल्या गुलमोहर निवासस्थानावरून इलेक्ट्रिक बाईकद्वारे कार्यालय गाठले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतः पुढाकार घेतल्याने प्रशासनात तसेच नागरिकांमध्येही या निर्णयाची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी हा निर्णय प्रेरणादायी मानला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून हरित ऊर्जा, इंधन बचत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात असताना महाराष्ट्र शासनानेही शासकीय अधिकाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, बस किंवा रेल्वेने प्रवास करावा, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी शक्य तितक्या प्रमाणात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर वाढवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय शासकीय वाहनांचा वापर मर्यादित ठेवत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमळनेर तालुक्यात सकारात्मक संदेश गेला असून, प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारीही अशा उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली आणि ऊर्जा बचतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणारा हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply