श्री मंगळग्रह मंदिरात अधिकमासानिमित्त धार्मिक विधींना भक्तिमय प्रारंभ

संकष्टी चतुर्थीनिमित्त मंत्रोच्चार, हवन, अभिषेक  व महात्म्य कथेने वातावरण झाले चैतन्यमय

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात अधिकमासानिमित्त बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वात मंत्रोपचाराचा जागर करीत भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

आशियास्टार आयकॉन अवॉर्ड प्राप्त, अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच समाजकार्य फाऊंडेशनचे मुख्य यजमान डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह खानेदश शिक्षण मंडळाचे चेअरमन विनोद अग्रवाल, मनोहर दीक्षित आणि मंदार कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सपत्नीक प्रायश्चित्त संकल्प, शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणपती वरुण पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वर्णन, दिग्रक्षण आदी पंचांग कर्म पार पडले. त्यानंतर लक्ष्मी-नारायण भद्र मंडल स्थापना करण्यात आली. नारायणपीठ देवता पूजन, नारायण यंत्र स्थापना तसेच नारायण, वराह व शालिग्राम देवतांचे राजोपचार पूजन करण्यात आले. यावेळी पुरुषसूक्ताच्या षोडश आवर्तन अभिषेकासह सहस्त्र तुलसीपत्र अर्चन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता यजमानांच्या हस्ते नवग्रह व रुद्रकलश स्थापना करून अग्नीमंथनाद्वारे अग्निकुंड प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर अग्नी व कुंडदेवता स्थापना, नवग्रह देवतांचे हवन, नारायण सहस्त्रनाम हवन तसेच पायस विशेष आहुती देण्यात आली. दुपारी ४ वाजता अधिकमास महात्म्य कथेचे निवेदक नाशिक निवासी व्यासाचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी यांनी आपल्या अमोघ वाणीमधून कथेचा प्रारंभ केला. सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान श्री मंगळग्रह देवतेची महाआरती संपन्न होऊन प्रथम दिवसाची सांगता झाली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह मंगल सेवेकरी आशिष चौधरी, भाविक व मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव यांनी मुख्य पौरोहित्य केले. त्यांना पुरोहित प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, यश जोशी, गणेश जोशी, वैभव लोकांक्षी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, हेमंत गोसावी आणि उमेश पाठक यांनी सहकार्य केले. कथा निरूपणावेळी चंद्रकांत जोशी आणि कॅसिओ वादक गणेश जोशी यांनी साथसंगत केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *