
घनकचरा ठेकेदार-कामगार वादावर पालिकेची मध्यस्थी; सामंजस्याने तोडगा काढण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील ठेकेदार आणि कामगार यांच्यात वेतन, भविष्यनिर्वाह निधी (पी.एफ.) आणि इतर सुविधांबाबत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी पालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी सन्माननीय मार्गाने प्रश्न सोडवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिले.
बैठकीदरम्यान कामगारांच्या वतीने मेहुल बिऱ्हाडे यांनी अनेक गंभीर मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने २०२२ पासून कामगारांना पी.एफ. दिलेला नाही. तसेच किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कामगारांचे वेतन बँक खात्यावर जमा करण्याऐवजी साध्या वहीत पेन्सिलीने रक्कम लिहून पगार देण्यात येतो आणि नंतर ती नोंद खोडून टाकली जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. याशिवाय काही कामगारांचा पी.एफ. दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर जमा होत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. तसेच कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले सुरक्षा किट देण्यात येत नसल्याची तक्रारही त्यांनी मांडली. दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनाचे ठेकेदार पवार आणि मुकादम खलील शहा यांनी कामगारांच्या आरोपांना उत्तर देताना वेगळी बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, काही कामगारांनीच पी.एफ. रोख स्वरूपात देण्याची मागणी केली होती. तसेच कामगार पूर्ण वेळ काम करत नसून केवळ तीन तासच काम करतात, असा दावा त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी अत्यंत कमी दराने ठेका घेतला असून गेल्या चार वर्षांपासून त्याच दराने मुदतवाढ देऊन काम करायला लावले जात आहे. याशिवाय पालिकेकडील काही बिलही अडकले असल्याचे त्यांनी नमूद केले. तरीदेखील कामगारांना नियमित वेतन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व मुद्द्यांवरून बैठकीत काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले. कामगारांनी आक्रमक भूमिका घेत करारानुसार किमान वेतन मिळाले पाहिजे, वेतन थेट बँक खात्यावर जमा झाले पाहिजे तसेच २०२२ पासूनचा थकीत पी.एफ. जमा करण्यात यावा, अशी ठाम मागणी केली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दोन्ही पक्षांची समजूत घालत सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी दोन पावले मागे घेत सकारात्मक मार्ग काढावा आणि शहराला वेठीस धरू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. अन्यथा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी बजावले. मुख्याधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र बसून चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा वाद लवकरच मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या बैठकीस आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, आरोग्य निरीक्षक संतोष जाधव, घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार तसेच संबंधित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply