
साने गुरुजी स्मारक रस्त्यासाठी लोकसहभागातून श्रमदान उपक्रम
११ जून रोजी सामूहिक श्रमदानातून एक किलोमीटर रस्त्याची होणार दुरुस्ती

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेरतर्फे स्मारकाला जोडणाऱ्या सुमारे एक किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकसहभागातून श्रमदान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. साने गुरुजी स्मृतीदिनानिमित्त ११ जून रोजी सामूहिक श्रमदानातून हा रस्ता तयार करण्यात येणार आहे.
स्मारकाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने शेतकरी बांधवांना बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन शेतात जाणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघात व जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले, महिला, शेतकरी तसेच पर्यटकांसाठी हा रस्ता रोजच्या वापराचा असल्याने तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.
“चला श्रमदानातून लोकसहभागातून — निर्माण करू रस्ता” या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी सर्व सजग व संवेदनशील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी मार्गदर्शन, ट्रॅक्टर, जेसीबी, श्रमदान व प्रेरणा यांची गरज असल्याचे प्रतिष्ठानने स्पष्ट केले आहे. पर्यावरण संवर्धनासह शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी हा रस्ता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्याशी ९०७५५७०५१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply