रोटरी क्लब अमळनेरची तब्बल १९ पुरस्कारांवर मोहोर, जिल्ह्यात अव्वल कामगिरीचा मिळवला मान

अमळनेर (प्रतिनिधी) : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०च्या वतीने नाशिक येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब अमळनेरने तब्बल १९ पुरस्कार व सन्मान पटकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. वर्षभर राबविण्यात आलेले विविध समाजोपयोगी उपक्रम, उत्कृष्ट प्रकल्प, सदस्यांचा सक्रिय सहभाग, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि रोटरीच्या ध्येयधोरणांनुसार केलेल्या कार्याची दखल घेत हा बहुमान प्रदान करण्यात आला.

नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे यजमानपद रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ व एनक्लेव्ह नाशिक यांनी भूषविले.

रोटरी क्लब अमळनेरने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक सेवा, कुटुंब कल्याण, युवक विकास, नैसर्गिक आपत्तीतील मदत, पोलिओ निर्मूलन तसेच विविध समाजोपयोगी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. विशेषतः ‘दिल से दिल तक’ उपक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियांसाठी केलेले कार्य, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्य, पोलिओ निर्मूलनासाठी राबविलेले उपक्रम तसेच इंटरॅक्ट, रोटरॅक्ट आणि आर.सी.सी.च्या माध्यमातून केलेल्या कामाची रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०च्या वतीने विशेष दखल घेण्यात आली. नवीन पारोळा रोटरी क्लबच्या निर्मिती व संगोपनात दिलेल्या योगदानाबद्दलही क्लबचा विशेष गौरव करण्यात आला.

रोटरी वर्ष २०२५-२६ मध्ये अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी आणि सचिव रो. आशिष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब अमळनेरच्या सर्व सदस्यांनी विविध प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रत्येक सदस्याचा सहभाग, प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची सकारात्मक भावना यामुळेच क्लबला हे अभूतपूर्व यश मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

“हे १९ पुरस्कार केवळ ट्रॉफी नसून वर्षभर केलेल्या सेवा कार्याची आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीची पोचपावती आहे,” अशी भावना रोटरी परिवारातून व्यक्त करण्यात आली.

या ऐतिहासिक पुरस्कार सोहळ्यास रोटरी क्लब अमळनेरच्या सहाय्यक गव्हर्नर रो. पूनम कोचर, रो. अभिजित सुभाष भांडारकर – डिस्ट्रिक्ट एनक्लेव्ह चेअर, रो. रोहित सिंघवी – कॉन्फरन्स सह-अध्यक्ष, तसेच रो. प्रदीप पारख, रो. राजेश जैन, रो. प्रतिक जैन, रो. योगेश येवले, रो. वृषभ पारख, रो. सचिन चोपडा आणि रो. पीयूष शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नाना शेवाळे यांच्या २०२५-२६ या कार्यकाळातील विविध जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच आर.आय. डायरेक्टर-इलेक्ट रो. बसुदेव गोल्यान, नेपाळ आणि आर.आय. डायरेक्टर-इलेक्ट रो. गुरजीत सिंग सेखों, पंजाब यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

 

या पुरस्कारांची मानाची कमाई

 

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कप – विजेता, उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसापत्र – रोटरी क्लब अमळनेर, नवीन रोटरी क्लबच्या निर्मिती व संगोपनासाठी डिस्ट्रिक्ट प्रशस्तीपत्र, रो. पूनम कोचर – डिस्ट्रिक्ट विशेष प्रशंसा पुरस्कार, रो. अभिजित सुभाष भांडारकर – डिस्ट्रिक्ट विशेष प्रशंसा पुरस्कार, रो. रोहित सिंघवी – डिस्ट्रिक्ट विशेष प्रशंसा पुरस्कार, रो. प्रतिक जैन – उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसापत्र पुरस्कार, रो. भैय्या पाटील – उत्कृष्ट पुरुष रोटेरियन पुरस्कार, सर्वोत्तम उपस्थिती बी-२ चषक – विजेता, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील उत्कृष्ट कार्य सी-१२ चषक – विजेता, ‘दिल से दिल तक’ उपक्रमांतर्गत सर्वाधिक हृदय शस्त्रक्रिया सी-१५ चषक – विजेता, चार मार्ग चाचणीचा उत्कृष्ट वापर डी-४ चषक – विजेता, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्ससाठी सर्वाधिक नोंदणी – उपविजेता, पोलिओ निर्मूलन उपक्रम सी-७ चषक – उपविजेता, इंटरॅक्ट उपक्रमातील उत्कृष्ट कार्य ई-२ चषक – उपविजेता, कुटुंब कल्याण उपक्रमातील उत्कृष्ट कार्य सी-८ चषक – उपविजेता, रोटरॅक्ट उपक्रमातील उत्कृष्ट कार्य ई-३ चषक – उपविजेता, रोटरी कम्युनिटी कॉर्प्स (आर.सी.सी.) उत्कृष्ट उपक्रम सी-४ चषक – उपविजेता तसेच नवीन पारोळा रोटरी क्लबच्या निर्मितीबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विशेष प्रशंसापत्र.

 

१९ पुरस्कार अभिमानाची नवी ओळख!

 

एकाच वर्षात तब्बल १९ पुरस्कार मिळवून रोटरी क्लब अमळनेरने आपल्या गौरवशाली वाटचालीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला आहे. हा सन्मान अध्यक्ष, सचिव किंवा काही निवडक सदस्यांचा नसून रोटरी क्लब अमळनेरच्या प्रत्येक सदस्याच्या योगदानाचा गौरव आहे. प्रत्येक सदस्याने दिलेला वेळ, केलेले नियोजन, प्रकल्पांमध्ये घेतलेला सहभाग आणि समाजसेवेची भावना यामुळेच हे यश शक्य झाले. रोटरी क्लब अमळनेरच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण रोटरी परिवाराचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *