
लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून सोने करून देण्याचे आमिष; महिलेचे अपहरण करून बलात्कार, आरोपिला केली अटक
अमळनेर (प्रतिनिधी) : लाडकी बहीण योजनेत जमा झालेल्या पैशांतून सोन्याचे दागिने करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला पळवून नेत तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील कलाली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी कलाली येथील सुदाम भगवान भिल याच्याविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाली येथील पीडित महिला पतीपासून विभक्त झाल्यानंतर आई-वडिलांकडे राहत होती. मार्च २०२६ मध्ये तिच्या लाडकी बहीण योजनेचे सुमारे ७० हजार रुपये जमा झाले होते. त्यावेळी गावातील दुर्गाबाई भिल व तिची आतेबहीण उषाबाई सुभाष भिल यांनी त्या पैशांचे सोने करून देण्याचे आमिष दाखविले. महिलेने त्यास संमती दिल्यानंतर मार्च २०२६ मध्ये ती स्वतःचा लहान मुलगा, उषाबाई सुभाष भिल व दुर्गाबाई भिल यांच्यासोबत अमळनेरला निघाली.
अमळनेर येथील मंगळ मंदिराजवळ उतरल्यानंतर तेथे दुर्गाबाई भिल यांचा मुलगा सुदाम भगवान भिल आला. त्यानंतर दुर्गाबाई भिल व उषाबाई सुभाष भिल यांनी पीडित महिला व तिच्या लहान मुलाला सुदाम भगवान भिल याच्या वाहनात बसवून पाठविले. मात्र सोनाराच्या दुकानाकडे जाण्याऐवजी सुदाम भगवान भिल याने वाहन दुसऱ्याच दिशेने नेले.
सुदाम भगवान भिल याने महिलेला चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे नेले. तेथे गावाबाहेर झोपडी बांधून तो महिलेसोबत राहू लागला. महिला किंवा तिच्या मुलाने याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने महिला भीतीपोटी त्याच्यासोबत राहत होती. या काळात सुदाम भगवान भिल याने तिच्यासोबत वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच महिलेच्या स्वतःच्या पैशांतून तिचा व मुलाचा खर्च भागविला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
काही दिवसांनंतर सुदाम भगवान भिल याने महिलेला व तिच्या मुलाला शिरपूर तांडा येथे आणले. तेथे सुमारे दोन महिने एका खोलीत राहिल्यानंतर १६ जून रोजी सुदाम भगवान भिल बाहेर गेल्याची संधी साधून महिला मुलासह कमखेडा येथे तिच्या बहिणीकडे पोहोचली. तेथे तिने संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर तिचा भाऊ सुदाम उर्फ उखु हिरालाल भिल व वडिलांना माहिती देण्यात आली.
याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून सुदाम भगवान भिल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), १४०(३), १४२, १२७(४) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.
मारहाणीचीही परस्परविरोधी तक्रार
दरम्यान, याच प्रकरणात दुर्गाबाई भिल यांनीही मारवड पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गावातील सुदाम उर्फ उखु हिरालाल भिल हा नात्याने आतेभाऊ असून त्याची बहीण आणि त्यांचा मुलगा सुदाम भगवान भिल यांचे प्रेमसंबंध होते. दोघे दोन-तीन महिन्यांपूर्वी घरातून निघून गेले होते.
१६ जून रोजी सुदाम भगवान भिल घरी परतल्यानंतर त्याचवेळी ती महिलाही परत आली. त्यानंतर रात्री सुमारे आठ वाजता सुदाम उर्फ उखु हिरालाल भिल हातात लाकडी दांडा घेऊन घरी आला. त्याने सुदाम भगवान भिल याला बाहेर बोलावून घेत महिलेला कुठे घेऊन गेला होता, अशी विचारणा केली. त्यावेळी दुर्गाबाई भिल यांनी संबंधित महिला स्वतःहून गेल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
याचा राग आल्याने सुदाम उर्फ उखु हिरालाल भिल याने दुर्गाबाई भिल यांच्या हातावर लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच सुदाम भगवान भिल याच्या पायावरही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाद सोडविण्यासाठी आलेले भगवान भिल यांनाही कपाळावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत दुर्गाबाई भिल यांचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर धुळे येथे उपचार करण्यात आले.
या प्रकरणी सुदाम उर्फ उखु हिरालाल भिल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी संजय पाटील करीत आहेत.

Leave a Reply