
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत १२० विद्यार्थिनी सहभागी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परीक्षेत एकूण १२० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकानंतर मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने सहभागी होऊन शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अशा परीक्षांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे ॲड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थिनींना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. दररोज महान व्यक्तींच्या चरित्रातील किंवा प्रेरणादायी पुस्तकांतील किमान १५ पाने वाचावीत तसेच आठवड्यातून किमान एक पुस्तक पूर्ण करून त्यातील विचार आत्मसात करावेत, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी प्रताप महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. कुमावत यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात संदीप घोरपडे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेचे शैक्षणिक व भाषिक महत्त्व विशद केले. अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच हिंदी भाषेवरील प्रभुत्वही अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. परीक्षेचे नियोजन व मार्गदर्शन हिंदी शिक्षक दिलीप पाटील यांनी केले. त्यांना जे. एस. पाटील, आर. एम. देशमुख, मुकेश पाटील आणि दीपक महाजन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले, तर मुकेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. राजभाषा हिंदीबाबत विद्यार्थिनींमध्ये आवड निर्माण करण्यास आणि भाषिक कौशल्य वृद्धिंगत करण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply