दशकभराची तहान भागली! चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या आदिवासी वस्तीत घरोघरी नळ; पाणी व गटारींचा प्रश्न मार्गी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मीना पाटील तसेच सदस्य संतोष चौधरी, शोभाबाई पाटील, जयश्री पाटील, लोटन भिल, अरुण पाटील आणि कल्पना पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आदिवासी वस्तीतील तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. घरोघरी नळजोडणी उपलब्ध झाल्याने आदिवासी बांधव, माता-भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. दिवसभर मोलमजुरी करून घरी परतल्यानंतरही महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि कुटुंबातील सदस्यांना अर्धा किलोमीटरहून अधिक अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत होती. जून महिन्याचे बारा दिवस उलटूनही उष्णतेचा कडाका कायम असताना गाव टँकरमुक्त असले तरी आदिवासी वस्तीतील नागरिकांना गावातील विहिरीवर जाऊन पाणी भरावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती. मात्र ग्रामपंचायतीने या समस्येची गंभीर दखल घेत सातत्याने पाठपुरावा केला आणि पाणीपुरवठा योजना थेट आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविले. आज प्रत्येक घरासमोर नळ सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. पाण्यासाठीची वणवण थांबल्याने गोरगरिबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. विशेष म्हणजे या कामासोबतच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गटारींचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. अंडरग्राउंड गटारींची कामे पूर्ण झाल्यामुळे परिसरात स्वच्छता वाढली असून सांडपाण्याच्या त्रासातून नागरिकांची मोठी सुटका झाली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, गोकुळ पाटील, सतीश पाटील, भैय्या बळिराम पाटील, माधवराव ठाकरे आणि जगन झेंडू भिल यांनी संपूर्ण ग्रामपंचायत, सरपंच सौ. वर्षा पाटील, सदस्य आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हे महत्त्वपूर्ण विकासकाम पूर्णत्वास गेल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आदिवासी वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असून विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दशकभराच्या प्रतीक्षेनंतर पाणीप्रश्न सुटल्याने आणि घरोघरी नळ सुविधा उपलब्ध झाल्याने चिमणपुरी-पिंपळे खुर्द येथील आदिवासी वस्तीत सध्या आनंद, समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

 

ग्रामस्थांच्या भावना आशा

 

ज्येष्ठ ग्रामस्थ माधवराव ठाकरे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. विशेषतः उन्हाळ्यात महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आज प्रत्येक घरापर्यंत नळ कनेक्शन पोहोचल्यामुळे आमची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या कामामुळे आमच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून आम्ही सर्वजण समाधानी आहोत.”

तर जगन झेंडू भिल यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आमच्या आदिवासी वस्तीत पाणी ही सर्वात मोठी समस्या होती. दिवसभर मोलमजुरी केल्यानंतरही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. आता प्रत्येक घराला नळ कनेक्शन मिळाल्याने पाण्यासाठीची धावपळ थांबली आहे. ग्रामपंचायतीने आमच्या अडचणी समजून घेत हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविल्याबद्दल आम्ही सरपंच, सदस्य आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. आज आमच्या वस्तीत खऱ्या अर्थाने आनंदाचे वातावरण आहे.”

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *