
श्री मंगळग्रह मंदिराच्या शिस्तीने जिंकले प्रवीण तरडे यांचे मन; ‘देऊळबंद २’ चमूची अमळनेरला विशेष भेट
चित्रपटाच्या उत्पन्नातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा संकल्प; कैलास वाणी यांची घोषणा

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रभर सध्या चर्चेत असलेल्या ‘देऊळबंद २ – आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाच्या प्रचारानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे तसेच निर्माते कैलासबापू वाणी यांनी शुक्रवारी (दि. १२ जून) अमळनेर येथील अतिप्राचीन, जागृत आणि देशातील दुर्मिळ अशा श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली. मंदिरातील भक्तिमय वातावरण, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि स्वच्छता पाहून दोघेही भारावून गेले. विशेषतः मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे प्रवीण तरडे यांनी तोंडभरून कौतुक केले.
मंदिर दर्शनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना प्रवीण तरडे यांनी आपल्या भेटीमागील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “अमळनेरचे माझे जिवलग मित्र राजेश पांडे यांनी मला आवर्जून सांगितले होते की, श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतल्याशिवाय परत जायचे नाही. त्यांच्या आग्रहामुळे मी येथे आलो. मात्र मंदिरात प्रवेश केल्यानंतर येथील सात्त्विक वातावरण, भाविकांची श्रद्धा आणि प्रशासनाची शिस्त पाहून मी प्रभावित झालो. या ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळाली.”
मंदिर परिसरातील स्वच्छता, हिरवाई आणि सेवेकऱ्यांचा एकसमान व शिस्तबद्ध वेश याबद्दलही त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. मंदिरातील पुजारी व सेवेकऱ्यांचे पारंपरिक सोवळ्यातील दर्शन आणि व्यवस्थापनातील काटेकोरपणा हे इतर धार्मिक स्थळांसाठी आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतःही पारंपरिक सोवळे परिधान करून प्रवीण तरडे यांनी श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले आणि ‘देऊळबंद २’ चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.
यावेळी निर्माते कैलास वाणी यांनी चित्रपटाच्या सामाजिक बांधिलकीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ‘देऊळबंद २’ या चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोरंजनासोबत समाजाप्रती जबाबदारी पार पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
याशिवाय ‘देऊळबंद’ या चित्रपट मालिकेचे पुढे एकूण अकरा भाग प्रदर्शित होणार असून त्या सर्व भागांमध्ये प्रवीण तरडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार असल्याची माहितीही कैलास वाणी यांनी दिली.
या प्रसंगी ‘ग्लोबल महातेज’ वृत्तपत्राच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले. मंदिर व्यवस्थापन समिती, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रवीण तरडे, कैलास वाणी तसेच चित्रपटाच्या संपूर्ण चमूचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक उपक्रमालाही पाठिंबा व्यक्त केला.
कार्यक्रमास मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, विश्वस्त डी. ए. सोनवणे, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, जयनील फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, सचिव वासू पाटील, अनुप गोरे, गजानन मालपुरे, नितीन भदाणे, जगदीश पाटील, महेश कोठावदे, मिंटू बारी, शाम पुरकर, रवी भोई, चेतन छावा, विलास कुलकर्णी, मेघा कुलकर्णी, वरूण पाटील, दर्शन पाटील, वेद पाटील, योगराज पाटील, किशोर महाजन, सनी गायकवाड, मनीष पाटील, ज्ञानदीप सांगोरे, सचिन पाटील, रोहित शिसोदे, भूषण लोहार यांच्यासह मंदिराचे सेवेकरी, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply