यात्रेपूर्वी अमळनेरमध्ये नाले सफाईला सुरुवात; शेकडो टन गाळ उपसा

अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराज यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेकडून शहरातील नाल्यांच्या सफाई मोहिमेला वेग देण्यात आला असून आतापर्यंत शेकडो टन गाळ काढण्यात आला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.

शहरात पिंपळे रोड, पिंपऱ्या नाला, विप्रो नाला, धुळे रोड नाला, गांधीनगर, बालेमिया परिसरासह एकूण पाच मोठे आणि इतर लहान मिळून सुमारे १७ नाले आहेत. यात्रोत्सव काळात भाविक आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन ही स्वच्छता मोहीम यात्रेपूर्वीच राबवण्यात येत आहे.

नाल्यांमध्ये साचलेला गाळ, काडी-कचरा, प्लास्टिक पिशव्या, भंगार तसेच तुटलेल्या लाकडी व कापडी वस्तूंमुळे पावसाळ्यात नाले तुडुंब भरून पाणी साचण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे दुर्गंधी व जीवजंतू वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यात्रेच्या काळात ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आधीच सफाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, संतोष माणिक, पर्यवेक्षक श्याम करंदीकर, सतीश बिऱ्हाडे, कुंदन सोनवणे, योगेश पवार यांच्या पथकांनी शहराचे चार विभाग करून नाल्यांतील गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू केले आहे. तसेच १८ मुकादमांना शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात नदीपात्रातील गाळ काढून परिसर स्वच्छ केला जाणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक किरण कंडारे यांनी दिली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *