
अमळनेर यात्रोत्सवासाठी नियोजन; सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरासह ४ पोलीस चौक्यांची उभारणी
अमळनेर (प्रतिनिधी) यंदाचा संत सखाराम महाराज यात्रोत्सव अधिक उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपालिकेकडून व्यापक नियोजन करण्यात आले असून दुकानांची संख्या वाढवणे, चारही दिशांना पोलीस चौक्या उभारणे, तसेच सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्ट दिवे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. माजी आमदार शिरीष चौधरी आणि हभप प्रसाद महाराज यांनी संयुक्त पाहणी करत विविध सूचना दिल्या.
यासंदर्भात आयोजित नियोजन बैठकीत नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, अनिल महाजन, सभापती कैलास पाटील, गुलाब पाटील, नगरसेवक श्रीराम चौधरी, पंकज चौधरी, मोहन सातपुते, सुयोग धनगर, बाळासाहेब संदानशीव, पंकज भोई, महेश देशमुख, प्रवीण पाठक यांच्यासह आरोग्य व पालिका कर्मचारी उपस्थित होते. यात्रेदरम्यान गर्दी व कोंडी टाळण्यासाठी १०० फूट रुंदीचे रस्ते ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार ठिकाणी पोलीस चौक्या उभारल्या जाणार आहेत. यासोबतच सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून मध्यभागी ३६० अंशांचा विशेष कॅमेरा लावण्यात येणार आहे. तसेच चार ठिकाणी हायमास्ट दिव्यांमुळे संपूर्ण यात्रास्थळ प्रकाशमान ठेवले जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराला जनित्र (जनरेटर) सक्तीचे करण्यात आले असून मीना बाजार परिसरातही रस्ते रुंद करून पालिकेकडून स्वतंत्र जनित्राची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अंधाराचा गैरफायदा घेऊन होणारे अनुचित प्रकार टाळता येणार आहेत. यावर्षी यात्रेत १६० ते १७० दुकाने उभारली जाणार असून नवीन पाळणे व विविध मनोरंजनात्मक साधनांचा समावेश असेल. यात्रेच्या स्वच्छतेसाठी दररोज रात्री पालिका कर्मचाऱ्यांकडून विशेष साफसफाई मोहीम राबवली जाणार आहे.तसेच नदीपात्र स्वच्छ करून सपाटीकरण करण्यात येणार असून भाविकांना तेथे बसून भोजन करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रथमार्गाचे डांबरीकरणही करण्यात येणार आहे. एकूणच यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांना सुरक्षित व आनंददायी वातावरण मिळावे, यासाठी पालिकेकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply