वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; अमळनेर तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दि. २ रोजी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

तालुक्यातील चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बु., अटाळे, शिरसाळे, आर्डी, अनोरे, जवखेडा, नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, मांडळ, वावडे यासह अनेक गावांमध्ये जोरदार वादळ आणि पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पिके आडवी पडली तर काही भागात पाण्याचा साठा झाल्याने नुकसान अधिक वाढले आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मका, बाजरी, ज्वारी, गहू व दादर या पिकांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके कापून शेतातच ठेवली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ही पिके पूर्णपणे भिजून पाण्याखाली गेली असून त्यांची गुणवत्ता घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. प्रशासनानेही तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मदतकार्य हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *