अमळनेरात जुलाब-उलट्यांच्या रुग्णांमध्ये वाढ; दूषित पाणी व बदलते हवामान कारणीभूत?

शासकीय व खासगी रुग्णालयांत वाढली गर्दी;  आरोग्य विभागाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात जुलाब, उलट्या आणि विषाणूजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दूषित पाणी, बदलते हवामान आणि वाढते तापमान यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना या आजारांचा अधिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा तीव्रपणा, अधूनमधून होणारे हवामानातील बदल आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या शंकांमुळे पोटाच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरणे, उघड्यावर विक्री होणारे खाद्यपदार्थ टाळणे तसेच वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. जुलाब किंवा उलट्यांचा त्रास झाल्यास ओआरएसचे द्रावण घेऊन तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी

 

पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरावे. उघड्यावर विक्री होणारे खाद्यपदार्थ खाणे टाळावे, जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात धुवावेत, जुलाब किंवा उलट्या झाल्यास ओआरएसचे द्रावण घ्यावे, प्रकृती बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांनीही योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा

 

“सध्या शहरात जुलाब, उलट्या आणि विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. दूषित पाणी व बदलते हवामान ही त्यामागील प्रमुख कारणे असू शकतात. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि जुलाब-उलट्यांची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.”

डॉ. जी. एम. पाटील, वैद्यकीय अधिकारी, अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *