अमळनेरात श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनचे जिल्हास्तरीय कार्यकर्ता अधिवेशन उत्साहात

एक हजाराहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती; सातशे सीड बॉलचे वाटप, सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा आढावा

अमळनेर (प्रतिनिधी) श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित जळगाव जिल्हास्तरीय कार्यकर्ता अधिवेशन रविवारी दि. ७ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या अधिवेशनाला जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील एक हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

अधिवेशनास सकाळी १० वाजता सामूहिक प्रार्थनेने  सुरुवात झाली. मुंबईहून आलेल्या ३० पदाधिकाऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते या आध्यात्मिक मेळाव्यात सहभागी झाले होते. खान्देशातील कार्यरत ४७ श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांच्या कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अधिवेशनात एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून संस्थेने गेल्या वर्षभरात केलेल्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. तसेच जळगाव जिल्ह्यातील ६२ केंद्रांच्या प्रगतीचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडण्यात आला. यावेळी संस्थेच्या रक्तदान शिबिराबाबत माहिती देत रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. विविध केंद्रांमार्फत राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रभावी मदतकार्य करता यावे यासाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ अभ्यासक्रमाची माहितीही देण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आयोजित विशेष उपक्रमांतर्गत उपस्थितांना वृक्षारोपणासाठी ७०० सीड बॉलचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चाललेल्या या अधिवेशनाची सांगता अभंग सत्संगाने झाली. सत्संगादरम्यान उपस्थित भक्तगण भक्तिरसात तल्लीन होऊन नृत्याचा आनंद घेत होते. या भव्य अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर उपासना केंद्रातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिवेशनातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *