शतकपूर्ती वर्षात अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची ऐतिहासिक भरारी; प्रथमच ११५ कोटींचा व्यवसाय

अमळनेर (प्रतिनिधी) शतकपूर्ती वर्ष साजरे करताना दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेने भक्कम आर्थिक प्रगतीची नोंद करत नवा इतिहास घडवला आहे. बँकेने आपल्या शंभर वर्षांच्या प्रवासात प्रथमच ११५ कोटी रुपयांचा व्यवसाय करत आर्थिक क्षेत्रात मजबूत स्थान निर्माण केले असून सक्षम व्यवस्थापन व नियोजनाची झलक या कामगिरीतून दिसून येत आहे.

दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची स्थापना १५ एप्रिल १९२६ रोजी झाली असून यंदा १५ एप्रिल रोजी बँकेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वीच या बँकेची स्थापना झाली होती, ही बाब तिच्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देते. शतकपूर्ती वर्षात बँकेने विविध आर्थिक निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय सुधारणा साधली आहे. ढोबळ अकार्यक्षम खात्यांचे प्रमाण (एनपीए) ६.७५ टक्के तर निव्वळ एनपीए १.९० टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. थकबाकीचे प्रमाणही केवळ ६.१२ टक्क्यांवर राखण्यात आले आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. भागभांडवल ३७०.३० लाख रुपये, रिझर्व्ह ८४४.७८ लाख रुपये, एकूण ठेवी ६७३०.६८ लाख रुपये, एकूण गुंतवणूक २६९३.६४ लाख रुपये, तर कर्जवाटप ४७५७.५८ लाख रुपये इतके झाले आहे. एनपीए रक्कम ३२१.११ लाख रुपये असून निव्वळ एनपीए ८६.११ लाख रुपये आहे. बँकेचा ढोबळ नफा ७१.३५ लाख रुपये असून रिझर्व्ह बँक, आयकर खाते व शासकीय नियमानुसार तसेच  सर्व तरतुदी वजा केल्यानंतर निव्वळ नफा ५५ लाख ५५ हजार रुपये इतका झाला आहे.

ग्राहकाभिमुख सेवांवरही बँकेने विशेष भर दिला असून सीटीएस क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस आणि एनईएफटी या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आगामी तीन महिन्यांत युपीआय व आयएमपीएससारख्या आधुनिक डिजिटल सुविधा सुरू करण्याचेही नियोजन आहे. या यशस्वी वाटचालीत बँकेचे अध्यक्ष भरतकुमार सुरेश ललवाणी, उपाध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग महाजन, संचालक मोहन बाळाजी सातपुते, प्रविण रामलाल जैन, पंडित रामचंद्र चौधरी, पंकज गोविंद मुंदडे, प्रदिपकुमार कुंदनलाल अग्रवाल, प्रविण श्रीराम पाटील, अभिषेक विनोद पाटील, रणजित भास्कर शिंदे, दिपक छबुलाल साळी, वसुंधरा दशरथ लांडगे, मनिषा विवेकानंद लाठी, तज्ञ संचालक अ‍ॅड. विनायक राजाराम पाटील, अ‍ॅड. विजय जगन्नाथ बोरसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत रामभाऊ पाटील, यांच्यासह बजरंग अग्रवाल, कुंदनशेठ अग्रवाल, सुभाष ओंकार पाटील, बिपीन(बापू) पाटील,निकुंभ नाना सरजू गोकलाणी, विनोदभैय्या पाटील, प्रकाश मुंदडा, अजय केले, आजी-माजी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. शतकपूर्ती वर्षात नोंदवलेली ही कामगिरी भविष्यातील प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *