
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी
प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार; कार्तिक व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘रोबो क्वेस्ट’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड करण्यात आली असून, शाळेचे प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित शाळांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगणक व रोबोटिक्स क्षेत्रातील अभिनव प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण केले. भारताला संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांनी परीक्षकांची विशेष दाद मिळवली. इयत्ता दहावीचे विद्यार्थी कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांनी सादर केलेल्या संगणकाधारित प्रयोगांना राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांच्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक व शास्त्रज्ञांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, आगामी काळात अवकाशात उपग्रह प्रक्षेपणाच्या वेळी इस्रोच्या स्पेस सेंटरला तीन दिवसीय भेट देण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार असून, त्या ऐतिहासिक क्षणाचे ते साक्षीदार ठरणार आहेत. तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील हिने डॉ. होमी भाभा एज्युकेशनतर्फे आयोजित स्पर्धात्मक परीक्षेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. तिचाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक, तांत्रिक व ज्ञानात्मक प्रेरणा देऊन शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविल्याबद्दल त्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान केवळ शाळेचाच नव्हे तर संपूर्ण अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या यशासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, प्रधानाचार्य जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. एस. अमृतकर, स्वाती माळी, डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, योगिता पाटील, सविता पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply