अमळनेरमध्ये आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अमळनेरमधील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील सोने-चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अमळनेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गोरख पाटील आणि निलेश जाधव यांनी या तपासात सहभाग घेतला. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४६/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी अल्तावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार, मध्य प्रदेश) याला तांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्याला अटक करून चौकशी केली असता, त्याने केरू उर्फ केहरू इडीया डाबर (वय ४५, रा. बलेडी गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश) याच्यासोबत घरफोड्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही बलेडी गावातून ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणत अटक केली. जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून तो अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

 

तीन वेळा अमळनेरमध्ये येऊन घरफोड्या

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री अमळनेर शहराबाहेरील शेताजवळ मोटारसायकल उभी केली. मध्यरात्रीनंतर पायी शहरातील नदीजवळील कॉलनीत जाऊन बंद घराचे कडी-कोंडा तोडून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यानंतर ३ एप्रिल २०२६ रोजी सिमेंट काँक्रिट रस्त्याजवळील कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून दागिने चोरले. २४ ऑगस्ट २०२६ रोजी याच परिसरातील एका बंद घरात प्रवेश करून लॉबीतील कपाटातून १० हजार रुपये रोख, देवघरातील चांदीची गणपतीची मूर्ती आणि नक्षीकाम केलेले चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे चोरून नेल्याची माहिती तपासात समोर आली.

 

सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त

 

पोलिसांनी तीन गुन्ह्यांशी संबंधित मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा क्रमांक ४४६/२०२६ मध्ये ९० ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती आणि २० ग्रॅम वजनाचे चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे जप्त करण्यात आले. गुन्हा क्रमांक ३२/२०२६ मध्ये ५ ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा तुकडा आणि १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे जप्त करण्यात आले. तर गुन्हा क्रमांक १५९/२०२६ मध्ये ५ ग्रॅम व १ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन करदोडे, २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन जोड वाडे आणि १८ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे जप्त करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *